नागपूर: कातलाबोडी येथील गुराखी युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेला गुराखी 18 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घरी परतला नाही. त्यामुळे काळजीत असलेल्या गावकऱ्यांनी अमोल अंबादास मुंगभाते याच्या शोधासाठी घनदाट जंगल पिंजून काढले. मात्र, कोंढालीपासून 18 किलोमीटर दूर कातलाबोडी जंगलात सदर गुराख्यावर वाघाने हल्ला केल्यामुळे गुराखी अमोलचा मृतदेह जंगलात आढळून आला.
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील ही घटना घडली असून 22 वर्षीय गुराखी अमोल 18 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजता नेहमीप्रमाणे गुरे चारायला गेला. सायंकाळी 4 वाजता गुरे नेहमीप्रमाणे परत आली. परंतु गुराखी अमोल न परतल्याने गावकऱ्यांनी अमोलचा शोध घेण्यासाठी सायंकाळी पाच वाजता जंगल गाठले व घटनेची माहिती कोंढाळी वनाधिकाऱ्यांना दिली. वनाधिकाऱ्यांना ही माहिती मिळताच त्यांनी व गावकऱ्यांनी घनदाट जंगलात अमोलचा शोध सुरू केला. रात्री 10 ते 11 च्या दरम्यान जंगलातील भडभड्या नाल्याच्या बाजूला अमोलचा जेवणाचा डबा, चप्पल, तसेच काठी, कुऱ्हाड एका झाडाखाली आढळून आली. त्या आधारे गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी त्या परिसरात अमोलचा शोध घेणे सुरू केले. यात काही अंतरावर अमोलची पँट, रक्ताचे डाग, केस, व त्याला वाघ फरफटत नेत असताना जागोजागी पडलेले रक्ताचे डाग व हाताचे बोट दिसले. या आधारावर मागोवा घेत जंगलामध्ये अमोलचा मृतदेह रात्री ११च्या दरम्यान दिसून आला.
वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. मात्र, गावकऱ्यांनी मृतदेह शवविचछेदनासाठी न जाऊ देता रस्ता रोखून धरला. याप्रसंगीगुराखी युवक अमोलच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला, व मोठ्या भावास नोकरी, तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान, या घटनेची माहिती माजी गृहमंत्री व आ. अनिल देशमुख यांना मिळाली. ते कातलाबोडीत पोहचले व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांचा संताप शांत करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांच्यासोबत चर्चा करून मृताच्या परिवाराला शासन नियमानुसार 25 लाख रुपयांची मदत देण्याची सूचना केली. 5 लाखांचा धनादेश 20 नोव्हेंबरला मृत अमोलच्या कुटुंबियांना देण्यात येणार असून 20 लाख रुपयांचा धनादेश मृताच्या वडिलांच्या नावाने बँकेत जमा करण्याची कबुली वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. भारतसिग हाडा यांनी आमदार अनिल देशमुख व उपस्थित गावकरी यांच्यासमक्ष दिली. तसेच मृताच्या मोठ्या भावाला वनविभागात रोजंदारी स्वरूपाची नोकरी देण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. यानंतरच गावकऱ्यांनी अमोलचा मृतदेह शव विच्छेदनासाठी वनविभागाच्या ताब्यात दिला.
कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघाकडून मानवी हल्याची ही पहिलीच घटना असून कोंढाळी वन परिक्षेत्रातील उपवन मेंढेपठार, कोंढाळी, घुबडी, व अहमदनगर या उप वनविभालगतच्या बोर अभयारण्यातील वाघ, बिबटे यांचा या भागात नेहमीच वावर आहे. यात एका वर्षात 82 पाळीव जनावरांना लक्ष्य केले असल्याची माहिती कोंढाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली. 1962 नंतर कातलाबोडी भागात प्रथमच वाघाने गुराख्याचा बळी घेतल्याची माहिती वन्यजीव मानव सदस्य उधमसिंग यादव यांनी दिली. यावेळी सरपंच अर्चना खोब्रागडे, नितेश कोवे, धनराज भड, चंद्रशेखर चिखले, जयंत टालाटुले, बंडू राठोड नितेश कोवे, वन्य जीव संरक्षण मानद सदस्य उधमसिंह यादव हजर होते.