Monday, February 6, 2023

फ्लॅटधारक शेतक-याला आठ जणांनी लावला 25 लाखांना गंडा

- Advertisement -

औरंगाबाद | फ्लॅटची इसार पावती करत शेतक-याकडून 25 लाखांची रक्कम उकळून फ्लॅट त्याच्या नावे न करता मामा-भाच्यासह आठ जणांनी गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2019 मध्ये घडला. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैठण तालुक्यातील गणेश रावण ढोबळे (33, रा. जांभळी) यांच्या वडिलांच्या नावे असलेली काही जमीन डीएमआयसी अंतर्गत हस्तांतरीत करण्यात आली होती. त्याच्या बदल्यात ढोबळे कुटुंबियांना 25 लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम गणेश ढोबळे यांच्या बँक खात्यात जमा होती. या पैशातून स्वत:चे घर घेण्याची त्यांची इच्छा होती. आणि मित्र सचिन जाधव, अशोक शेजुळ, योगेश उभेदळ यांना ढोबळे घराच्या शोधात असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्यांनी आदित्य रत्नाकर गारपगारे, त्याचा मामा मंगेश पारसनाथ भागवत, विपुल वक्कानी, संदीप भगत यांच्याशी ओळख करुन दिली. त्यानंतर कांचनवाडी, गट क्र. 49 मधील अण्णासाहेब एकनाथ लोखंडे यांच्या अजिंक्यतारा बिल्डिंग, सैनिक विहार येथील थ्री बीएचके फ्लॅट ढोबळे यांना दाखविण्यात आला. तो फ्लॅट ढोबळे यांनी विकत घेण्याचे ठरवले. त्यानुसार, लोखंडे यांचा फ्लॅट मित्र, गारपगारे आणि त्याचा मामा भागवत यांच्या मध्यस्थीने घेण्याचे ठरले. यावेळी इसारपावती करुन देण्यासह दोन महिन्यांनी फ्लॅटची रजिस्ट्री करुन देतो असे सांगण्यात आले. पुढे ठरल्याप्रमाणे ढोबळे यांनी फ्लॅटची संपुर्ण रक्कम आरटीजीएसव्दारे गारपगारे याच्या खात्यात जमा केली.

- Advertisement -

1 नोव्हेंबर 2019 रोजी जागा मालक अण्णासाहेब लोखंडे यांनी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर फ्लॅटची इसारपावती करुन दिली. परंतू गारपगारे याने व्यवहाराची रक्कम लोखंडे यांना न देता स्वत:कडे ठेवून घेतली. दोन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतरही फ्लॅटची रजिस्ट्री करुन दिली नाही. त्यामुळे लोखंडे यांना याबाबत विचारणा केली असता तेव्हा लोखंडे यांनी व्यवहाराचे पैसे मला मिळाले नाहीत. असे सांगत गारपगारे याच्याकडून पैसे मिळवून देण्याची हमी दिली. मात्र, लोखंडे यांनी पैसे परत मिळवून न देता वारंवार उडवा -उडवीची उत्तरे दिली. पुढे गारपगारे आणि त्याचा मामा भागवत यांनी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी ढोबळे यांच्याकडून शैक्षणिक कागदपत्रे देखील हस्तगत केली. तसेच एका को-या मुद्रांकावर ढोबळे यांची स्वाक्षरी घेतली.