Thursday, October 6, 2022

Buy now

छ. संभाजी महाराजांचे लोकसहभागातून साकारणार 55 फूटांचे भव्यदिव्य स्मारक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसहभागातून या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असल्याने कराड तालुक्याचा सहभाग या महत्वपूर्ण कार्यात घेण्याचा निर्णय स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहावर ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस समितीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी व शिवशंभूप्रेमी तरूण मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कराड शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक व्हावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीस अनुसरून प्राथमिक स्तरावर स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीची स्थापना करून यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. नगरपालिकेकडे भेदा चौकातील साईट व्ही या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यास मान्यता देण्यात आली आहे. या जागेत भव्य स्मारक उभारणीसाठी शासनाच्या विविध परवानग्यां घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकूण 55 फुटांचे स्मारक होणार असून ते राज्यात सर्वाधिक उंचीचे व भव्य व्हावे, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या स्मारकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुमारे 20 फूट उंचीचा असून कोल्हापूर येथील मूर्तिकार संजीव संकपाळ यांनी याचे क्ले मॉडेल तयार केले आहे. स्मारकात ग्रंथालय, म्युरल्स, अभ्यासिका असणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. स्मारकाची उभारणी बैठकीत प्रारंभी या कार्यात सुरवातीपासून सहभागी असणारे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख, माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

स्मारक कराड तालुक्याला भूषण ठरेल

या स्मारकाची उभारणी लोकसहभागातून होणार आहे. हे स्मारक कराड शहराला नव्हे तर कराड तालुक्यालाही भूषण ठरणार आहे. यासाठी कराड तालुक्यातील शिवशंभूप्रेमी नागरिक, तरूणांचाही सहभाग घेण्याचे निश्चित करण्यात आले. तर विविध समित्यांची स्थापना करण्यात येणार असून यात वेळ देऊ शकणाऱ्या तरूणांना नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.