Video : प्रेमप्रकरण समजताच आई वडीलांनी पोटच्या लेकीचा जीव घेतला; डोंगरात 14 दिवसांनी सापडला मृतदेह

कराड | स्वतः च्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड जवळील एका गावात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा प्रेमप्रकरणातून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. तब्बल 14 दिवसांनी डोंगरात पुरलेला मुलीचा मृतदेह आज रविवारी दि. 1 मे रोजी ताब्यात घेण्यात आला. यानंतर हि सर्व घटना उघड झाली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी, कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद 17 एप्रिल रोजी कराड पोलिस ठाण्यात दाखल झालेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याचे फिर्याद मुलीचे वडिलांनी दिलेली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्याकडे होता. शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी मुलीचे वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. यातून आई- वडिलांनीच मुलीचा खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह पवारवाडी येथील डोंगरावर पुरला.

आज रविवारी 1 मे रोजी सकाळी पोलिसांनी पवारवाडी येथे मुलीचा पुरलेला मृतदेह दुपारी 12.30 वाजता ताब्यात घेतला. यावेळी तहसिलदार, वैद्यकीय अधिकारी तसेच पोलिस अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी कराड तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, तहसिलदार विजय पवार, पोलिस निरीक्षक दिपज्योती पाटील, रेखा दूधभाते यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलिस निरीक्षक रेखा दूधभाते या करित आहेत.