औरंगाबाद | भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना कुंकासारखे पावडर देत त्यांचे दागिने लंपास करणाऱ्या भोंदूबाबांच्या जोडीला गुन्हेशाखेच्या पथकाने जवाहरनगर भागातून मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून सोने, हिऱ्याच्या अंगठीसह 43 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. योगेश खंडू सोनवणे वय-27 (मूळ गाव कोथजळ, ता.जि. हिंगोली, ह.मु.करमाड) विश्वनाथ नारायण शिंदे वय-32 (मूळ गाव बोरगाव,ता.मालेगाव, जि वाशीम, ह.मू. करमाड) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही भोंदू बाबांची नावे आहेत.
मुकुंदवाडी भागातील महिलेला भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आरोपीनी कुंकू सारखे पावडर दिले. त्याचा वास घेताच महिला बेशुद्ध पडली आणि आरोपीनी महिलेच्या हातातील सोन्याची व हिरेजडित आशा दोन अंगठ्या लंपास केल्या होत्या. हे आरोपी जवाहर नगर भागात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गुन्हेशाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचत दोघांना अटक केली.
भोंदूबाबांच्या जोडीच्या ताब्यातून चोरीच्या अंगठ्या सहित 43 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या दोघांनी यापूर्वी देखील कैलास नगर भागात महिलेला 8 हजार रुपयाला गंडा घेतला होता. ही कारवाई उप निरीक्षक अमोल देशमुख, हवलंदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख आदींच्या पथकाने केली.