सातारा शहरालगत खेडमध्ये तीन दिवस कडक संचारबंदीचा निर्णय लादला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचा निर्णय लादण्यात आला आहे. गरीब,कष्टकरी मजुरांवर तीन दिवस उपासमारी लादण्यात आली असल्याची खंत गरीब कुटूंबातील लोक व्यक्त करीत आहेत.

सातारा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग तसेच सातारा- कोरेगाव रस्त्यावर विस्तारलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संगमनगर, विकासनगर, पिरवाडी, कृष्णनगर, वनवासवाडी, प्रतापसिहनगर अशी गरीब व मध्यमवर्गीयांची वसाहत आहे. तसेच नवीन सोसायटी व बंगले, लघुउद्योग यांचे जाळे आहे. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आहे तर दुसर्‍या बाजुला कष्टकरी, मजूर, भाजीवाले, फेरीवाले, रिक्षावाले व छोटी -मोठी कामे करणारी कुटुंबे राहतात. दररोज मिळणार्‍या रोजगारी वर उपजीविका चालते. त्यांचा विचार न करता कोरोना काळातील गैरसोय दडपण्यासाठी स्थानिक पातळीवर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुळातच एवढ्या मोठ्या वसाहतीमध्ये साधी रुग्णवाहिका नाही. कोविड सेंटरचा पत्ता नाही. निम्या लोकांना अद्यापही लस मिळाली नाही. आरोग्याचा बोजवारा झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदे पर्यंत दुर्लक्ष केले आहे. त्याची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे. आधी पुनर्वसन नंतर धरण अश्या पद्धतीने अगोदर आरोग्य सुविधा नंतर संचारबंदी करणे गरजेचे असताना खासगी कामाला मदत करणार्‍या काही अधिकार्‍यांना खुश करण्यासाठी ही संचारबंदी लादली गेली आहे. अशी माहिती कष्टकरी आणि मजुरांनी दिली आहे.

शासकीय शिवथाळी सोडाच पण लोकांना शासकीय योजनेतील मोफत शिधा मिळाला नाही. त्याबाबत कोणीही आवाज उठवला नाही. पण संचारबंदी यशस्वी झाल्याची चित्र निर्माण करण्यात येत आहे. हे म्हणजे गरीबाच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कष्टकरी, मासेमारी करणार्‍या गरीब वस्तीमध्ये या संचारबंदीने शोककळा पसरली आहे. संचारबंदी लादण्याची वेळ का आली? याचे आत्मचिंतन करण्याची कोणालाही सवड नाही. जिल्हा प्रसासनाने आरोग्य व पुरवठा विभागाने योजनेतील शिधा, ऑक्सिजन बेड, लसीकरणाची सुविधा पूर्ण केल्यानंतर संचारबंदीची गरज भासली नसती. आता ‘वराती मागून घोडे’ धावण्याचा प्रकार केला जात आहे. वाड्या-वस्तीत खाद्यपदार्थ शोधण्यासाठी गरोब पालकवर्ग जीवाचे रान करीत असून लादलेल्या संचारबंदीने गरिबांना आजपासून दि.2 एप्रिल पर्यंत उपसमारीशी लढावे लागणार हे मात्र निश्चित झाले आहे.

Leave a Comment