मुलगी मोबाइलवर गेम खेळण्यात होती मग्न अन् आरोपीने तिकडे आईची केली हत्या

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने या महिलेच्या मुलीसमोरच तिची हत्या केली आहे. हि हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकन्या आव्हाड असे हत्या करण्यात आलेल्या मृत महिलेचे नाव आहे. सुकन्या यांच्या पतीचे 7 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. सध्या सुकन्या आपल्या तीन मुलांसोबत कॅम्प चारच्या चिंचपाडा परिसरात राहत होत्या. यादरम्यान सुकन्या यांचा काही दिवसांपासून अनिल भातसोडे या व्यक्तीसोबत परिचय वाढला. यामुळे सुकन्या यांच्या घरी अनिलचं येणं जाणं वाढलं होतं. ते दोघे लग्नसुद्धा करणार आहेत. अनिल हा अनेकदा सुकन्याकडे पैशांची मागणी करत असल्याने दोघांमध्ये वाद व्हायचा. घटनेच्या दिवशीदेखील त्यांच्यात मोठा वाद झाला. यानंतर आरोपी अनिलने याच वादातून सुकन्याला बेदम मारहाण करत तिचे डोक भिंतीवर आपटलं. यात सुकन्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला होता.

हा सगळा धक्कादायक प्रकार सुकन्या यांच्या मुलीने पाहिला. ती घराबाहेर मोबाईलमध्ये व्हिडीओ गेम खेळत असताना, तिला घरातून आईच्या ओरडण्याचा आवाज आला तेव्हा घरात डोकावून पाहिले असता अनिल हा तिच्या आईचे डोके भिंतीवर आपटत असताना तिने पाहिले. यानंतर सुकन्या यांची मुलगी आकांक्षा हिच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी अनिल भातसोडे याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, सुकन्या आणि अनिल हे दोघेजण गेल्या अनेक दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. आणि याच वादातून अनिलने सुकन्याच्या पोटात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसंच तिचं डोकं भिंतीवर आपटले. यानंतर मृत सुकन्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.