औरंगाबाद | फुलंब्री तालुक्यातील शिल्डा शिवारातील बेलदरा परिसरात मंगळवारी रात्री शेतात झोपलेल्या तरुणाचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फुलंब्री पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतलं आहे. तेथे श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र श्वान सुमारे शंभर फुटावरच घुटमळले तूर्तास या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप सुदाम चव्हाण (वय 32 रा. बिल्डा ता. फुलंब्री ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील बिल्डा शिवारातील परिसरात सुदाम चव्हाण यांची शेतजमीन आहे. त्यांना दोन मुले आहेत. सुदाम चव्हाण व संदीप चव्हाण हे दोघे बापलेक शेतात जेवले. सुदाम हे झोपण्यासाठी गावात आले तर संदीप शेडचे काम चालू असल्याने शेतातच बाजेवर झोपला होता. तू मधी रात्री गाढ झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने कुर्हाडीने डोक्यात सपासप घाव केले. यामध्ये संदीप हा गंभीर जखमी झाला आणि तडफडत बाजेवरून उठून काही अंतरावर जाऊन पडला.
दरम्यान, सकाळी याच परिसरात राहणारा अनिस पठाण याला संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याचे दिसून आले. त्याने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी खासगी वाहनाने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
चार संशयित ताब्यात
या तरुणाच्या हत्येचे गांभीर्य ओळखून श्वानपथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथकाने घटनास्थळापासून सुमारे शंभर फूट समोर असलेल्या नाल्यापर्यंत माग काढत जागेवरच घुटमळला. त्याचबरोबर बोटांचे ठसे घेणारे पथकही याठिकाणी आले होते. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड ताब्यात घेऊन पोलिसांची चक्रे फिरवून संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. मात्र, सायंकाळपर्यंत कुठलीही धागेदोरे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.