राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या ऑनलाइन नामांकनासाठी आता आधार अनिवार्य नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाची अधिसूचना

नवी दिल्ली । केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) नॅशनल अवॉर्ड पोर्टलवर ऑनलाइन नामांकनासाठी आधार कार्डची अट काढून टाकली आहे. मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. या पोर्टलवर राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन करताना आधार कार्ड आवश्यक नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

गुरुवारी जारी केलेल्या या अधिसूचनेत असे म्हटले गेले आहे की, गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या उद्देशांसाठी, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर स्वेच्छेने आधार ऑथेंटिफिकेशन करण्याची परवानगी आहे. ते अनिवार्य नाही. याचा अर्थ आता ऑनलाइन नामांकनासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता नाही. विविध मंत्रालये किंवा विभागांच्या विविध पुरस्कारांसाठी ऑनलाइन नामांकन करावे, असेही या अधिसूचनेत म्हटले गेले आहे. तसेच, विविध क्षेत्रात किंवा उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था किंवा स्वयंसेवी संस्था (एनजीओ) पुरस्कारासाठी नामांकनात त्याचा लाभ घेऊ शकतात.

तुमचा आधार कॉलम डिसेबल्ड आहे का?
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या अधिसूचनेपूर्वी, कोणत्याही पुरस्कारासाठी नामांकन करताना आधार अनिवार्य होते. आता राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवरील ‘तुमच्याकडे आधार आहे का’ हा कॉलम डिसेबल्ड करण्यात आला आहे.

प्रश्न उपस्थित होत आहेत
आधार कार्डबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची चर्चा झाली आहे. आधार कार्डच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी फेटाळून लावल्या. याआधी 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधार योजना संतुलित असल्याचे सांगून बँक खाती, मोबाइल कनेक्शन, मुलांचे प्रवेश इत्यादींसाठी त्याच्या अनिवार्य आवश्यकतांना ग्रीन सिग्नल दिला होता.