सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
एका मेंढीला सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळू शकते हे कोणाला सांगूनही पटणार नाही. मात्र सांगलीच्या माडग्याळ बाजारात एक मेंढी तब्ब्ल दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.
जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याची सहा मेंढ्याची तब्बल 14 लाखाला विक्री करण्यात आली. मेंढ्याना लाखो रुपयात भाव मिळाल्याने गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ मधील मेंढीचे चांगले रुबाबदार नाक, विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे.
त्यामुळे माडग्याळ मेंढीची दर वाढलेले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव ही मेंढी मिळवून देत आहे. माडग्याळचा बाजार मेंढ्यासाठी प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढ्या विक्रीसाठी येत आहेत. मेंढ्याना मिळालेल्या भावामुळे मागणीही वाढू लागली आहे.