व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

इंदोली पतसंस्थेच्या फरार मॅनेजरला अटक : कोटीत अपहार

कराड | इंदोली (ता. कराड) येथील ग्रामविकास ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील 4 कोटी 5 लाख 27 हजार 86 रुपयांच्या अपहार प्रकरणी मॅनेजर रमेश गोपाळ पोरे (रा. इंदोली, ता. कराड) याला सातारच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या प्रकरणातील 30 जणांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यातील ही पहिली कारवाई आहे. दरम्यान, संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

इंदोली पतसंस्थेत अपहार झाल्याप्रकरणी जुलै 2022 मध्ये चेअरमन, संचालक, व्यवस्थापक अशा 33 जणांविरुध्द उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. संशयित सर्वजण कराड न्यायालयात अटकपूर्वसाठी गेले असता, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. उंब्रज पोलिसांकडून नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर यातील संशयित मॅनेजर रमेश पोरे याने कराड न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला.

मात्र, न्यायालयात अर्ज फेटाळल्यानंतर संशयित पसार झाला. दि. 20 रोजी संशयित इंदोली येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. संशयित रमेश पोरे याला उंब्रज येथून अटक करण्यात आली. संशयिताला प्राथमिक चौकशी करुन न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास सपोनि शिवाजी भोसले करत आहेत.