युवक काँग्रेस निवडणूक: नितीन राऊतांकडून मुलाच्या विजयासाठी सरकारी अधिकाऱ्यांचा गैरवापर; भाजपच्या आरोपाने खळबळ

मुंबई | सध्या राज्यभर युवक काँग्रेसची रणधुमाळी सुरू असतानाच याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कडून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी उभा राहिलेले नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या विजयासाठी ऊर्जामंत्र्यांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर मत नोंदणी साठी दबाव आणण्यात येत आहे असा आरोप भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केला आहे.

विक्रांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत नितीन राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुकीस उभा असलेल्या आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी नितीन राऊत यांनी महावितरणची यंत्रणा काँग्रेसच्या दावणीला लावली आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्यांना कामाला लावलं जात आहे. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत कशा प्रकारे कुणाल राऊत यांच्यासाठी मत नोंदणी करायची यासाठी बैठका घेतल्या जात आहेत असा आरोप विक्रांत पाटील यांनी केला.

काँग्रेसच्या निवडणुकीसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. पण सरकारी यंत्रणा त्यांचे काम सोडून तुम्ही तुमच्या कामाला लावणार असाल तर आमचा यासाठी विरोध असून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या करणार आहोत असेही विक्रांत पाटील यांनी म्हंटल.

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्याकडे देखील आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत. तुमचे राज्यातील मंत्री अशा प्रकारे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणार असतील तर राहुल गांधी यांनी कारवाई करत नितीन राऊत यांची हकालपट्टी करावी असेही विक्रांत पाटील यांनी म्हंटल.