उद्धव ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACB ची नोटीस; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातीळ बाकी राहिलेल्या आमदारांना टार्गेट करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सत्तांतराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना आता एसीबीने नोटीस पाठवली आहे. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश नोटीसीद्वारे देण्यात आले आहेत.

उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीच्यावतीने नुकतीच नोटीस पाठवण्यात आली आहे. एसीबीची नोटीस आलेले नितीन देशमुख ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना यापूर्वी एसीबीच्यावतीने नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

नेमकं नोटीसमध्ये काय म्हटले आहे?

एसीबीच्यावतीने आमदार नितीन देशमुख यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या नोटीसीत असे म्हंटले आहे की, आपल्याविरुद्ध उघड चौकशी क्रमांक ईऔ/46/अकोला/2022 अन्वये आपल्या संपत्तीची उघड चौकशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती परीक्षेत्रात अमरावती येथे सुरु आहे. सदर उघड चौकशीचे संबधाने आपले बयान नोंदविणे आवश्यक असल्याने बयान देणेकरिता आपण 17 जानेवारी सकाळी अकरा वाजता अपर पोलीस अधिक्षक कार्यालय लाचलुचपत प्रतिबंध विभाग अमरावती येथे उपस्थित राहावे. तसेच सोबत दिलेल्या मत्ता दायित्व फ़र्म क्रमांक एक ते साची संपूर्ण माहिती भरुन द्यावी, असे नोटिसीत म्हंटले आहे.