पुणे- सासवड मार्गावर साताऱ्यातील वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात

सातारा- पुणे | पुणे-सासवड मार्गावर वडकी नाल्याजवळ वारकरी घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पो व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सहा वारकरी जखमी झाले. हि घटना मंगळवारी (दि. 21) घडली आहे. या अपघातातील सर्वजण सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आहेत.

सीताबाई गणपत धायगुडे, (वय – 75), संगीता शहाजी जाधव (वय – 50 रा. सुपा नारोळी, खंडाळा), बाळासाहेब विठ्ठल धायगुडे (वय- 48, रा. पिंपरे बुद्रुक, रा. खंडाळा, जि. सातारा), अमोल मधुकर झेंडे (वय- 25, रा. जिंती, ता. फलटण, जि. सातारा), कुंदा शिवाजी वाघ (वय- 45, रा. पिंपरे बु, ता. खंडाळा, सातारा), माउली ज्ञानेश्वर तोडकर (वय- 48, रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड मार्गावरून लोणंद, फलटण, सातारा, व बारामती येथून वारकरी आयशर टेम्पोतून आळंदीच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे -सासवड मार्गावरील वडकी नाल्याजवळ आले असता सासवडकडे जाणाऱ्या एका ट्रकने या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये आयशर टेम्पोतील सहा वारकरी जखमी झाले. त्यांना तात्काळ हडपसर येथील सोमनाथ चौधरी व प्रतिक्षा गायकवाड यांनी जखमींना वडकी येथील श्रीनाथ हॉस्पिटलला दाखल केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.