व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नवरदेवाचा मृत्यू : खंडोबाच्या दर्शनाहून येताना नवविवाहित दाम्पत्यांच्या गाडीला अपघात

लोणंद | फलटण तालुक्यात रविवारी दोन ठिकाणी अपघात झाले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर काळज येथे देवदर्शन करून येताना क्रूझर उलटली. या अपघातात बार्शी (जि.सोलापूर) येथील नवविवाहित युवकाचा मृत्यू झाला, तर नवविवाहिता जखमी झाली. .

काळज येथील अपघातात नवरदेव सुखदेव रवीद्र वाघमोडे (वय- 26, रा. बार्शी, जि. सोलापूर) व आळजापूर येथील अपघातात शहाजी मल्हारी मिसाळ (वय 50, रा. आदर्की बुद्रक, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला आहे.

सुखदेव वाघमोडे यांचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. विवाहानंतर ते रविवारी पुण्यातील जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनासाठी गेले होते. जेजुरीत दर्शन घेतल्यानंतर ते फलटण तालुक्यातील धूळदेव येथील धुळोबादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते. दुपारी 4 च्या सुमारास काळज गावच्या हद्दीत त्यांची क्रूझर आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे क्रूझर पलटी झाली.

क्रूझरमध्ये नवविवाहित दाम्पत्य होते. अपघातात नवरदेव सुखदेव हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला फलटण येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर क्रूझरमधील नवविवाहितेसह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती फलटण पोलिसांना दिल्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.