विट्यातील दुर्घटना : गाडीचा स्टार्टर मारला, गाडीने पेट घेतला अन् चालक जळून खाक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | विटा शहरातील शाहू नगरमध्ये आज भीषण घटना घडली. रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५० रा. शाहूनगर, विटा) हे भाजीपाला व्यवसायीक त्यांच्या चारचाकी गाडीत बसले. गाडी सुरू करण्यासाठी त्यांनी स्टार्टर मारला. पण अचानक ठिणग्या उडून गाडीने पेट घेतला. क्षणार्धात गाडीसह रघुनाथ ताटे हे जळून खाक झाले. या भीषण घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेबाबत नगरसेवक अजित गायकवाड यांनी पोलिसात माहिती दिली.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, शाहूनगर मधील नीलसागर हॉटेलच्या मागे रघुनाथ ताटे हे भाजीपाला व्यवसायिक वास्तव्यास होते. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने ते गाडीतून शहर आणि परिसरात भाजीपाला विक्री करत होते. आज (दि. ७) सोमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे रघुनाथ ताटे यांनी त्यांच्या गाडीमध्ये (क्र. एमएच ०१ व्ही २४०९) भाजीपाल्याचा माल भरला. त्या नंतर हा माल विक्रीसाठी घेवून जाण्यासाठी ते गाडीत बसले.

गाडीत बसल्यानंतर दरवाजा बंद केला. ताटे यानी स्टार्टर मारला मात्र अचानक ठिणग्या उडू लागल्या आणि गाडीने अचानक पेट घेतला. क्षणार्धातच गाडी पूर्णपणे जळाली. रघुनाथ यांना पाडीतून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला. गाडीला लागलेली आग पाहून रघुनाथ यांच्या मुलाने आरडाओरडा केला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रघुनाथ यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक बळवंत कान्हेरे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment