Monday, February 6, 2023

फलटणच्या राजू बोके टोळीतील 5 जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

- Advertisement -

सातारा | महामार्ग व इतर रस्त्यावरील निर्मनुष्य जागी प्रवाशी, दुचाकीस्वार व महिला प्रवाशी, जोडपी यांना मारहाण करून दागिने, मोबाईल, रोकड असा ऐवज लुटणार्‍या फलटणच्या राजू बोके टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. टोळी प्रमुख महेश जयराम जगवाळे (वय- 27 वर्षे रा. कांबळेश्वर ता. बारामती), राजू उर्फ राज राम बोके (वय- 34 रा. मंगळवार पेठ, फलटण), ऋतिक उर्फ बंटी देवानंद लोंढे (वय – 19 रा. कांबळेश्‍वर, ता. बारामती), दिलीप राजाराम खुडे (वय- 32 रा. लक्ष्मीनगर फलटण), संकेत सुनिल जाधव (वय- 24 वर्षे रा. कल्पनानगर, तांदुळवाडी रोड बारामती) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 मे रोजी रात्री 08 च्या सुमारास फिर्यादी व फिर्यादीचे दोन मित्र भडकमकर नगरनजिक बाणगंगा पात्रानजिक चिंचेच्या झाडाखाली बोलत होते. तेथे तीन इसमांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, गाडी, ए.टी.एम. पॅनकार्ड, ब्लुटुथ, आधारकार्ड असा एकुण 5 लाख 16 हजारांचा मुद्देमाल जबरी चोरी करुन नेला होता. याप्रकरणी फलटण पोलीस शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले.

- Advertisement -

सर्व आरोपी संघटितपणे आर्थिक फायद्याकरीता सातारा, सोलापूर व पुणे जिल्हयातील महामार्ग व इतर जोडरस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवाशी, दुचाकीस्वार व महिला प्रवाशी, जोडपे व्यापारी यांच्यावर लक्ष ठेवून वाहनांचा पाठलाग करुन सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्कम असा ऐवज घातक हत्यारांचा धाक दाखवून, त्यांना मारहाण करून दरोडे, गंभीर दुखापतीसह जबरी चोरी, चोरी दुखापत अशा प्रकारचे गुन्हे असे करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी मोक्कांतर्गत कारवाईसाठी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला. प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र (कोल्हापूर) मनोज लोहिया यांनी मंजुरी दिल्यानंतर मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.

या मोक्का प्रस्ताव मंजुरीकरीता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे पोलीस निरीक्षक बी. के. किंद्रे, एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ, उपनिरीक्षक ए. ए. कदम, हवालदार प्रविण शिंदे, पो. ना. अमित सपकाळ, पो. ना. शरद तांबे यांनी सहभाग घेतला आहे.

एसपी बंसल यांच्या काळात आतापर्यंत 10 टोळ्यांतील 58 जणांना मोक्का

सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सातारा जिल्ह्यात कार्यभार स्विकारल्यापासून सन 2020 मध्ये 2 व सन 2021 मध्ये आजपर्यंत 8 असे एकुण 10 संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधिल 58 इसमांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये 41 इसमांना हद्दपार केले आहे. यापुढेही गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का व हद्दपारी अन्वये अशीच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.