Thursday, February 2, 2023

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची रुग्णालयातून सुखरूप वापसी; सायरा बानोंनी मानले चाहत्यांचे आभार

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयातून आजच डिस्चार्ज मिळाला आहे. अचानक श्वसनाचा त्रास बळावू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबई येथील नॉन कोविड पीडी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले असता आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. यात दिलीप कुमार स्ट्रेचरवर झोपलेले दिसत आहेत व सोबत पत्नी सायरा बानो देखील आहेत. दिलीप कुमार यांच्या ट्विटर हॅण्डलवरून हि माहिती देण्यात आली आहे याचसोबत सायरा बानो यांनी त्यांच्या चाहत्यांनी केलेल्या प्रार्थना व प्रेमासाठी आभार मानले आहेत.

https://twitter.com/TheDilipKumar/status/1403235451809320963

- Advertisement -

बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देत घरी पाठविण्यात आले आहे. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानो यांनी सर्व चाहत्यांचे व त्यांच्या शुभचिंतकांचे मनापासून आभार मानले आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, “आम्ही खूप खूश आहोत. दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसातून फ्लुईड काढण्यात आले आहे. आता आम्ही घरी जात आहोत. चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी मी सर्वांना धन्यवाद देते.”

अभिनेते दिलीप कुमार हे ९८ वयोवर्षीय असून गेल्या अनेक काळापासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक व नाजूक झाली आहे. त्यांना नित्य नियमाने रुटीन हेल्थ चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. दरम्यान, या सर्व काळात त्यांची पत्नी सायरा बानो या क्षणाक्षणाला त्यांची साथ देत असतात. त्या नेहमीच त्यांची व्यवस्थित काळजी घेताना दिसतात. याहीवेळी दिलीप याना श्वसनाचा त्रास जाणवला असता सायरा बानो यांनी त्वरित रुग्णालयाकडे धाव घेतली. दरम्यान दिलीप कुमार यांच्या निधनाच्या अफवांनी जोर धरला होता. मात्र या बातम्यांचे खंडन करीत सायरा बानो खंबीर राहिल्या व त्या नेहमीच दिलीप यांच्या चाहत्यांना ट्विटरवरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत होत्या. दिलीपकुमार यांच्या सुखरूप परतण्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.