Thursday, March 30, 2023

अभिनेत्री प्रियंका चोप्रा साकारणार ‘अहिल्याबाई होळकर’ यांची भूमिका

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री प्रियंका चोप्रा जरी हॉलीवूडमध्ये गेली असली तरी तिचे चाहते संपूर्ण भारतात आहेत. प्रियंका चोप्राने आपल्या करियरमध्ये अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकांमध्ये वैविध्य असते. आजपर्यंत तिने जितक्या चित्रपटांमध्ये काम केले त्या प्रत्येक चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकांवर तिच्या चाहत्यांनी नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता प्रियंकाला अहिल्याबाई होळकर यांच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बॉलिवूडची पिग्गी चॉप्स बाजीराव मस्तानी नंतर आणखी एका ऐतिहासिक चित्रपटात दिसण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

प्रसिद्ध लेखक मनोज मुंतशिर या नव्या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत, अशी माहिती आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिरेखेसाठी आवश्‍यक असलेली आग, पॅशन आणि आत्मविश्‍वास प्रियंकामध्ये असल्याचे मनोज यांनी सांगितले आहे. अद्याप या भूमिकेसाठी सविस्तर आणि अधिकृतरीत्या प्रियांकासोबत चर्चा झाली नसून कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी प्रियांकाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. जर चालू असलेली सर्व समिकरणे जुळून आली तर प्रियांका चोप्राला आपण राणी अहिल्याबाई होळकरांच्या बायोपिकमध्ये बघू शकू.

कोरोना महामारीमुळे प्रियांका गेल्या कित्येक महिन्यांपासून परदेशातच अडकलेली आहे. ती भारतात परत आल्यानंतर तिच्याशी या चित्रपटासंदर्भात चर्चा होणार असल्याचे त्यांनी निर्मात्यांनी सांगितले आहे. २०२१ च्या अखेरीस राणी अहिल्याबाई होळकर यांच्या संघर्षमयी जीवनाचे भाष्य करणारा हा चित्रपट फ्लोअरवर येऊ शकेल. सध्या मनोज मुंतशिर आपल्या संपूर्ण टीमबरोबर मिळून या चित्रपटाच्या कथानकावर आणि डायलॉगवर काम करत आहेत. बाहुबली सिरीजनंतर दक्षिणात्य इंडस्ट्रीतील निर्मात्यांनीही मनोज मुंतशिरला डोक्यावर घेतले आहे. त्याला विविध प्रोजेक्ट्साठी विचारण्यासही सुरुवात केली आहे.