आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : पाटणला चर्चा साहेबांच्या आदेशाची अन् कार्यकर्त्यांच्या टेहळणीची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील

पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सोमवारी पार पडली. निष्ठा यात्रेत साहेबांच्या “त्या” आदेशाची आणि कार्यकर्त्यांच्या टेहळणीची चर्चा पाटण तालुक्यात सुरू आहे. यात्रेत आलेली लोक कोण आहेत, कोणत्या गटाची, पक्षाची आहेत. त्याचबरोबर साहेबांनी दिलेल्या “त्या” आदेशाची कोणी पायमल्ली केली. या सर्व गोष्टीची टेहळणी मल्हारपेठ येथील सभेत सुरू होती, त्याबाबतच मोठी चर्चा आता पाटण विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात सुरू झाली आहे.

पाटण विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे विद्यमान आ. शंभूराज देसाई यांनी शिवसेनेतील फूटीनंतर शिंदे गटाला साथ दिली आहे. त्यानंतर राज्यात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांची निष्ठा यात्रा सुरू केली आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आपलीच मूळ शिवसेना असल्याचे सांगितले जात आहे. तसेच बंडखोरी केलेल्यांना इशारा देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून करत आहेत. राज्यात निष्ठा यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. त्यामुळे सभेला जमणारी गर्दी ही शिवसेनेची नसून राष्ट्रवादी पुरूस्कृत असल्याची टीकाही आता आ. शंभूराज देसाई यांनी केली आहे. परंतु या सर्व यात्रेत व आरोप प्रत्यारोपात पाटणला निष्ठा यात्रेत चर्चा रंगली आहे, ती वेगळ्याच कारणाने.

मल्हारपेठ येथे आ. शंभूराज देसाई यांच्या विरोधात ही जाहीर सभा होती. त्यामुळे आ. शंभूराज देसाई आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांना साहेबांचा एक आदेश देण्यात आला होता. या आदेशात जे कोणी आदित्य ठाकरेंच्या सभेला दिसतील, त्याचा ऊस कारखान्यात नेला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते, असे सभास्थळी जमलेले शिवसैनिक सांगत होते. तर आ. शंभूराज देसाई गटातील कोण- कोण सभेला दिसत आहे, यांची वितंबूत माहिती घेण्यात येत होती. यासाठी मल्हारपेठसह परिसरातील काही कार्यकर्ते दुचाकीवरून घिरट्या घालत होते. त्यामुळे आता पाटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या ऊसाचे राजकारण पुन्हा एकदा पेटणार असे दिसत आहे.

निष्ठा यात्रेला राष्ट्रवादी, देसाई गट आणि शिवसैनिकांची उपस्थिती 

मल्हारपेठ येथे आयोजित आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कार्यकर्ते होते. परंतु त्यासोबत आ. शंभूराज देसाई यांच्या गटातील काही कार्यकर्त्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. या सभेला 5 ते 7 हजार कार्यकर्त्यांची हजेरी होती. परंतु त्यापैकी मोठा वाटा हा शिवसैनिकांचा होता. त्यामुळे आता निष्ठा यात्रेनंतर पाटण तालुक्यातील वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. आता शिवसैनिक आणि आ. शंभूराज देसाई गटातील वाद पाटण  तालुक्यात सुरू झालेला आहे.