जगप्रसिद्ध अशा विशेष छायाचित्रांबद्दल माहिती सांगणारे विजय ढोबळे यांचे सदर | भाग १
जगप्रसिद्ध ‘मोना लिसा’ च्या पेंटिंग नंतर लोकांना सर्वात जास्त आकर्षित करणारा ‘स्टीव्ह मॅक क्युरी’ या फोटोग्राफर ने १९८४ साली काढलेला हा फोटो. हिरवट डोळे व डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ घातलेल्या या मुलीचा फोटो जून १९८५ साली ‘नॅशनल जिओग्राफीक’ मॅगझीनच्या कव्हर पेजवर छापून आला होता ज्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली होती. तिच्या त्या हिरवट डोळ्यांनी जगाला बंदिवान बनवले होते. ‘शरबत गुला’ असं नाव असलेल्या या मुलीला ‘अफगाण गर्ल’ म्हणूनही ओळखलं जातं. तसेच तिला ‘पहिल्या जगाची तिसऱ्या जगातील मोना लिसा’ असंही म्हंटलं जातं.
हा फोटो काढल्यानंतर त्यावेळी मॅक क्युरी ला तिचे नाव माहित नव्हते म्हणून तिला ‘अफगाण गर्ल’ म्हंटलं गेलं. परंतु त्यानंतर त्याने तिचा शोध घेण्याचे ठरविले. त्यासाठी तो नॅशनल जिओग्राफीकच्या टीमसोबत पुन्हा पाकिस्तान मधील त्या निर्वासित कॅम्प मध्ये गेला परंतु त्याठिकाणी ती सापडली नाही. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर शेवटी जानेवारी २००२ मध्ये त्या मुलीचा शोध लागला गेला. १३ किंवा १६ वय असताना तिने रहमत गुल नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर ती पुन्हा १९९२ मध्ये अफगाणिस्थानात परत गेली होती. त्यांना चार मुलेही होती त्यातील एकचा नंतर मृत्यू झाला.
१६ ऑक्टोबर २०१६ साली खोटी कागदपत्रे वापरून अनधिकृत पद्धतीने पाकिस्तानमधे राहत असल्यामुळे तिला अटक करण्यात आली आणि ती पुन्हा चर्चेत आली होती. सध्या ती तिच्या तीन मुलांसोबत पाकिस्तानमधील काबुल शहरात राहते.
सोव्हिएत रशिया ने अफगाणिस्तान वर हल्ला केल्यानंतर तेथून स्वतःचा जीव वाचवून पाकिस्तानच्या टेकडीवर ‘निर्वासित कॅम्प’ मध्ये ती दाखल झाली होती व त्याच ठिकाणी ‘क्युरी’ ने तिचा हा फोटो काढला होता. डोळ्यांमध्ये युद्धविषयी प्रचंड राग व चेहऱ्यावर संताप व्यक्त होत होता. तब्बल २३ वर्षे चाललेल्या या युद्धामध्ये लाखो नागरिक मारले गेले व त्यापेक्षा जास्त लोकं विस्थापित झाले होते.
विजय ढोबळे