AFG Vs SA : अफगाणिस्तानने रचला इतिहास!! आफ्रिकेला हरवून सिरीज जिंकली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये नवा इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिरीज (AFG Vs SA) जिंकण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे. काल शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 177 धावांनी पराभव करत अफगाणिस्तानने 3 मॅचच्या वनडे सीरीजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मागील काही वर्षांपासून अफगाणिस्थान क्रिकेटने अनेक मोठमोठ्या संघाना पराभवाचं पाणी पाजलं आहे. आता थेट आफ्रिकेविरुद्ध मालिका खिशात घालून इतर संघांनाही अफगाणिस्तानने इशारा दिला आहे.

शारजाह येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्थानचा कर्णधार हशमतुल्लाह शहीदीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय अफगाणी फलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाजने 105 धावा करत खणखणीत शतक मारले. गुरबाजने वनडे करियरमधील सातव शतक झळकावलं. या खेळीत गुरबाजने १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. गुरबाज शिवाय अजमतुल्लाह ओमरजईने 86 आणि रहमत शाहने ५० धावांची खेळी केली. या सर्वांच्या कामगिरीच्या जोरावर ५० षटकात ३११ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेचे सर्वच गोलंदाज अफगाणी फलंदाजासमोर निष्प्रभ ठरले.

३१२ धावांचे टार्गेट घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हे आव्हान पेलवले नाही. कर्णधार टेम्बा बावुमा आणि टोनी डी जॉर्जीच्या या सलामीवीरांनी 73 धावांची सलामी दिली, मात्र ते दोघे आऊट झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या १३४ धावाच करू शकला. दिग्गज फिरकीपटू राशिद खान आणि नांगेलिया खरोटेने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं. दोघांच्या फिरकीपुढे आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी गुडघे टेकले. राशिदने 9 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा देऊन 5 विकेट घेतल्या तर. नांगेलियाने 6.2 ओव्हर्समध्ये 26 धावा देऊन 4 विकेट मिळवल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा डाव 134 धावात आटोपला आणि अफगाणिस्थानने 177 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्थानने क्रिकेट इतिहासात नवा रेकॉर्ड केला आहे. सुरुवातीला लिंबू- तिंबू वाटणारा अफगाणिस्थानचा संघ आता इतर संघासाठी चांगलाच धोकादायक ठरत आहेत.