पोलीस,डॉक्टर,सैनिक,वकील होण्याकडे अधिक कल चंद्रपूर जिल्ह्यातील मुलींचा कल आरोग्य व जैविक शिक्षणाकडे
चंद्रपूर प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करता यावे, या हेतुने राज्य माध्यमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण (विद्या प्राधिकरण) ने राज्यस्तरावर एकाच दिवशी कलचाचणी घेतली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणवेशधारी शासकीय सेवेला पहिली पसंत दिली तर वाणिज्य शाखेला द्बितीय प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेऊन यासंदर्भात मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आवडीच्या क्षेत्राची अभ्यासशाखा निवडून भविष्यात उत्तम करिअर करता यावे, याकरिता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून विविध कसोट्या तयार करण्यात आल्या होत्या. व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करणे, विद्यार्थी व पालकांना या क्षेत्रांची माहिती देऊन जागृती करणे हा कलचाचणीचा मुख्य हेतु आहे. ही परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे घेण्यात आली. ऑफलाईन पद्धतीने कलचाचणी घेण्याकरिता राज्य मंडळाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात आली होती. राज्यामध्ये १६ लाख १३ हजार ६०९ विद्यार्थ्यांनी हे कल चाचणी दिली.
नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थी कलचाचणीला सामोरे गेले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थिनींनी आरोग्य व जैविक शिक्षणाला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे निकाल सांगतो. याशिवाय मानवविद्या अभ्यासशाखाही विद्यार्थिनींना आवडत असल्याचे निकालातून दिसून आले