पदवीधर,शिक्षक मतदारसंघातील पराभवानंतर भाजपच्या ‘ऑपरेशन लोट्स’चे ‘तीन तेरा..’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाल्याने या आघाडीचं बळ वाढलं आहे. तर भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या विजनानंतर भाजप नेत्यांच्या ‘ऑपरेशन कमळ’च्या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. याशिवाय आपलीच सत्ता येईल. हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोसळेल, अशा वल्गना करणाऱ्या भाजपासमोर आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाच थोपवून धरण्याचं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक होती. शिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवलेलीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. भाजपची निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती यशस्वी होणार की दोन वेगळ्या विचारधारेच्या आघाडीला मतदार स्वीकारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या नव्या समीकरणावर पहिल्यांदाच मतदान झालं आणि त्यात महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांकडे मतं ट्रान्सफर करून एकी दाखवली असून आघाडीत बेबनाव नसल्याचंही दिसून आलं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विजयी झाले आहेत. नागपूर पदवीधरमध्ये काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर असून पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर, धुळे-नंदूरबार पदवीधरमध्ये भाजपचे अमरिश पटेल विजयी झाले आहेत. या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागांवर विजय मिळाला असून हा विजयही पटेल यांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळे शक्य झाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

भाजप नेत्यांचे ऑपरेशन लोटसचे स्वप्न तूर्तास भंग
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील यशानंतर राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. भाजपचे नेते नारायण राणे यांनीही राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोट्स होणार असल्याचं म्हटलं होतं. तर पदवीधरांच्या रणधुमाळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार की भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (after graduate constituency election Will Operation Lotus fail in Maharashtra?)

आगामी निवडणुकीत भाजपच्या अडचणीत वाढ
मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका आणि 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ही आघाडी एकत्रित दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवाय तोपर्यंत इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना थोपवून धरण्याची तारेवरची कसरतही भाजपला करावी लागणार आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पराभव समोर दिसू लागल्याने भाजपनेही महाविकास आघाडीच्या एकसंघतेमुळे हा पराभव झाल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढावं त्यानंतरचे निकाल पाहावे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब केल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment