Wednesday, June 7, 2023

Uber नंतर आता OLA टॅक्सीचा प्रवासही महागला, ‘या’ शहरांमध्ये वाढले भाडे

नवी दिल्ली । पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतीत झालेल्या प्रचंड वाढीचा परिणाम आता महागड्या भाड्यात दिसून येत आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता महागड्या भाड्याचा भार सोसावा लागणार आहे. सध्या अ‍ॅपवर आधारित टॅक्सी सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांनी भाडेवाढ जाहीर केली आहे. मात्र लवकरच ऑटो आणि बसच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता आहे.

अ‍ॅप-आधारित कॅब प्रोव्हायडर OLA ने देखील देशातील अनेक शहरांमध्ये भाडे वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने हैदराबादमधील पार्टनर चालकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये माहिती देण्यात आली आहे. हैदराबादमध्ये चालणाऱ्या मिनी आणि प्राइम कॅब सर्व्हिसेसचे भाडे 16 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची माहिती ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.

भागीदार चालकांना ई-मेलची माहिती दिली
मात्र, भाडेवाढीची माहिती OLA कडून सार्वजनिक करण्यात आलेली नाही, तसेच कोणत्या शहरात भाडे वाढवण्यात आले आहे हे देखील सांगण्यात आलेले नाही. मात्र हैदराबादच्या पार्टनर चालकांना पाठवलेल्या ई-मेलवरून देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही भाडे वाढवण्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Uber ने याआधीच भाडे वाढवले ​​आहे
याआधी त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी Uber नेही देशातील विविध शहरांमध्ये 12-15 टक्क्यांनी भाडे वाढवले ​​आहे. OLA आणि Uber चे कॅब चालक पेट्रोल आणि सीएनजीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे त्यांच्या बचतीला मोठा फटका बसत असल्याने भाडे वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.

पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे वाढ झाली आहे, तर देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये 15 दिवसांत सीएनजीच्या दरातही सुमारे 15 रुपयांनी वाढ झाली आहे.