व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पायलटचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ; एअर इंडियाचं विमान अर्ध्या वाटेतून माघारी बोलावलं

नवी दिल्ली । वैमानिकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे एअर इंडियाच्या वतीने सुरू असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत मॉस्कोला निघालेलं विमान परत बोलवावं लागलं आहे. आता सर्व क्रू कॉरेंटाईन राहणार असून दुसरं विमान मॉस्कोला पाठवलं जाईल. उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलेलं हे विमान परत बोलावण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. आता हे विमान मॉस्कोला कधी निघणार याविषयीची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

शनिवारी सकाळी मॉस्कोसाठी निघालेलं एअर इंडियाचं ए-३२० निओ हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. जाण्यापूर्वी क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली होती, ज्यापैकी वैमानिकाची चाचणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, विमान उड्डाण होण्यापूर्वी क्रू मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आहे असं चुकून वाचण्यात गेल्याची माहिती आहे. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि विमान परत बोलवावं लागलं. एअर इंडियाचं हे विमान दिल्ली विमानतळावर १२.३० वाजता दाखल झालं.

दिलासादायक बाब म्हणजे मॉस्कोला निघालेल्या या विमानामध्ये एकाही प्रवाशाचा समावेश नव्हता. विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासातच हा प्रकार समोर आला. एका दुसऱ्या व्यक्तीने पुन्हा एकदा क्रू मेंबर्सच्या चाचणी अहवालांवर नजर मारली असता ही चूक लक्षात आली. यानंतर एअर इंडियाने चालढकल करण्याऐवजी मोठा निर्णय घेत विमान परत बोलावलं. हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. आता या विमानातील क्रू मेंबर्सला नियमानुसार १४ दिवस कॉरेंटाईन रहावं लागणार आहे. आता याऐवजी दुसरं विमान एअर इंडियाकडून मॉस्कोला पाठवलं जाणार असल्याची माहिती आहे. मॉस्कोमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानातून परत आणलं जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”