संगीतकार, गायक अजय गोगावले वाढदिवस विशेष | निस्सीम चाहत्याने पत्र लिहून दिला आठवणींना उजाळा

कल्लाकार कट्टा | विकी पिसाळ

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या बुलंद आवाजाने झिंगाट करुन सोडणाऱ्या गायक-संगीतकार अजय गोगावले यांचा आज वाढदिवस. अजय-अतुल या नावाने प्रसिद्ध असलेली ही जोडी मागील बऱ्याच वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आज अजय ४४ वर्षांचा झाला असून त्याच्या वाढदिवसानिमित्त विकी पिसाळ नावाच्या त्याच्याच एका चाहत्याने त्याच्यासाठी एक मनमोकळं पत्र लिहिलं आहे. पाहुयात हे पत्र नक्की काय आहे..!!

1990 च्या आधी..आणि नंतरचं मराठी संगीत एकाच साच्यातलं होतं.. श्रवणीय असलं तरी त्यात तोच तोचपणा जाणवायचा.. पुढे ही मराठी चित्रपट बनत गेले..पण त्यातलं संगीत मात्र बरच मागे राहिलं.. जुन्या मराठी गाण्यांवरच महाराष्ट्र कान तृप्त करुन घेत होता….जुणे, मुरलेले मराठीतले अनेक संगीतकार आपापल्या परिने किल्ला लढवत होते..पण मेकॅनिजम असल्याने ती गाणी ठराविक वर्गापुरतीच प्रसिद्ध रहायची …. एक वेळ असं वाटत होत की मराठी संगीताचा कणा मोडतोय की काय… लावणीच्या पुढं महाराष्ट्राच संगीत जाईना..एखाद दुसरी प्रेमगीते ओठांवर यायची एवढच.. पिंजरा मधील लावणी तर गेल्या 9-10 वर्षापुर्वी पर्यंत लोक ऐकत होते…. अन माझ्यासारखे या तोचतोचपणाला कंटाळुन कान तृप्त करण्यासाठी हिंदी गीतांचा आधार घेत होते.. हे सर्व घडत असताना आपल्याच महाराष्ट्राची दोन लेकरे हे सर्व जवळुन पाहत होती.. याची तिव्रता इतरांपेक्षा या दोघांना जाणवत होती… मराठी साठी काहीतरी करण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसु देत नव्हती.. कोण होते ते दोघे..??… एका टिपिकल मध्यमवर्गीय घरातली ही सख्खी भावंड…नाव- अजय-अतुल…

..

10 -12 वर्षापुर्वीपर्यंत महाराष्ट्रीयन संगीत एकाच साच्यातल होतं… ते या दोघांनी ‘अग बाई अरेच्चा’ च्या माध्यमातुन अक्षरश: ओढुन काढलं.. अन एका नवीन पर्वाला सुरुवात केली.. अगं बाई….ते आत्तापर्यंतचा सुपर 30. मराठी, हिंदी संगीताचा जवळजवळ 10-12 वर्षाचा मोठा प्रवास या दोघांनी यशस्वीपणे पार पाडला.. महाराष्ट्राचे कान तृप्त करण्याचा जणु यांनी विडाच उचलला..आणि तो य़शस्वी ही केला…गेली कित्येक वर्ष “पिंजर्यात” अडकलेली लावणी या दोघांनी बाहेर काढली… अन “नटरंग” मधुन लावणीला नवी ओळख देऊन पुन्हा लावणीची प्राणप्रतिष्ठा केली.. यांनी बनवलेलं प्रत्येक गाणं मग ते हिंदी असो मराठी असो किंवा तेलगु.. माणुस गुणगुणल्याशिवाय राहत नाही.. मोबाईलमधल्या हिंदी गाण्यांच्या मधे मराठी गाण्यांना हक्काची पुरेपुर जागा मिळण्याच श्रेय खरतर या दोघांनाच जातं..मराठी संगीताला आलेली मरगळ या दोघांनी कायमची घालवली.. संगीत असं ही असु शकतं..मराठी गाणी अशीही बनु शकतात हे या दोघांनी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला दाखवुन दिलं…आज महाराष्ट्रातलं कुठलं घर असं नसेल की जे या दोघांना ओळखत नाही…बऱ्याच कालावधीनंतर या दोघांनी महाराष्ट्राला पुन्हा एकदा संगीताशी जोडलं.. गाणं म्हणायला लावलं, गुणगुणायला लावलं.. एवढच नव्हे तर त्यांच्याच गाण्यावर या जोडीने सार्या महाराष्ट्राला लग्नात, वरातीत बेभान होऊन नाचायला लावलं.. आणि वारीमधे ‘माऊली माऊली’ म्हणत महाराष्ट्राला तल्लीन ही केलं…

नटरंग नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तमाशा व ऑर्केस्ट्राच्या सुरुवातीला “नटरंग उभा” या त्यांच्या गाण्याने आज ही तमाशा व ऑर्केस्ट्राची सुरुवात होते. साधारण चार वर्षापुर्वी अतुलदांशी फोनवर बोलण्याचा योग आला. माझं अजय अतुल प्रेम पाहुन आनंदीवास्तुचे श्री.आनंद पिंपळकर सर यांचा एक दिवस अचानक कॉल आला. तुझ्या लाडक्या संगीतकारांपैकी अतुलजी गोगावले सोबत आहेत. बोल त्यांच्याशी. सरांनी हे वाक्य बोलताच मी अक्षरश: गडबडलो होतो. हॅलो.. नमस्कार मी अतुल बोलतोय असं ते म्हणताच अंगावर काटा आला होता. पुढे आमच्या गप्पा झाल्या. पण त्यांच्याशी बोलायला मिळालं ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट होती. फोन ठेवल्यानंतरही मला आनंदाच्या भरात काही सुचत नव्हतं.. पण अतुल सर बोलताना ते अगदी घरातली व्यक्ती असल्यासारखे वाटले. आस्थेने केलेली विचारपुस, गप्पा, या साऱ्यातून कोणी मित्र बोलत असल्याचे वाटत होते. कष्टप्रद सुरु झालेला त्यांचा प्रवास ते हिंदीतल्या झी सारेगमपा, आणि इंडियन आयडॉल सारख्या कार्यक्रमात “अजय अतुल स्पेशल” होणारे एपिसोड्स पाहताना तेव्हा चाहता म्हणुन होणारा आनंद शब्दातीत असतो. हे सर्व लिहिण्याच आज कारण म्हणजे… या अजय अतुल जोडगोळीतल्या अजय यांचा आज वाढदिवस…

शेतकरी जमिनीचा पोत ओळखतो. आणि तिचा कस कसा वाढेल याचाही तो प्रयत्न करतो आणि करतच राहतो. अजय अतुल यांनी ही महाराष्ट्राची माती, नस ओळखली होती. जे जे हवं होतं, गरजेचं होतं ते सर्व त्यांनी या मातीसाठी पेरलं. आणि ते संगीतरुपी बीज आज देशभर, किंबहुना जगभर पोहचतय आणि पोहचत राहील. आफ्रिकेतल्या तरुणाने त्याच्या स्टाईल मधे गायलेलं “झिंगाट” याच उत्तम उदाहरण. वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अजयजी.. इथुनपुढे ही तुमची गाणी आम्हास ऐकायला मिळो..आणि कलेच्या देवतेचा, तुमच्या लाडक्या बाप्पाचा आशिर्वाद नेहमी तुम्हा दोघांच्या पाठीशी राहो..एक मात्र खरं…ही संगीतकार जोडी जर महाराष्ट्राला लाभली नसती तर महाराष्ट्राचे कान आजही अतृप्तच राहिले असते…

तुमचाच एक निस्सीम चाहता,
विकी पिसाळ (संपर्क – 9762511636)