हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाचा व्याप वाढल्यामुळे आणि पक्ष संघटनेच्या वाढत्या जबाबदारीमुळे अजित पवारांनी या पदाचा दिला आहे. अजित पवारांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे बारामती तालुका ‘अ’ वर्ग मतदार संघातून बॅंकेत गेल्या 32 वर्षापासून संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते.
संचालकपदाचा राजीनामा
पुणे जिल्हा सहकारी बँकेची जबाबदारी अजित पवार 1991 पासून सांभाळत होते. त्यांच्या नेतृत्वामुळेच आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला देशातील नंबर 1 बँकची ओळख मिळाली आहे. आज पुणे जिल्हा सहकारी बॅंक नावलौकिक होण्यामागे अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. मात्र आता याच बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मात्र फक्त कामाचा व्याप वाढल्यामुळे अजित पवारांनी हा राजीनामा दिल्या असल्याची सांगितले जात आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार वेगळे झाल्यामुळे त्यांच्यावरील कामाची जबाबदारी आणखीन वाढली आहे. अशा काळातच आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांचे बिगुल देखील वाजल्यामुळे कामाच्या व्यापात वाढ झाली आहे. अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अजित पवारांच्या दररोज वेगवेगळ्या बैठका पार पडत आहेत. तसेच त्यांच्या सभांचे देखील आयोजन करण्यात येत आहे. यासगळ्या कारणामुळेच अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे म्हणले जात आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक
1991 साली अजित पवार यांच्याकडे या बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यावेळी बॅंकेचा एकूण व्यवसाय रू. 558 कोटी होता. मात्र अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज या बँकेचा व्यवसाय रू.20 हजार 714 कोटींवर पोहचला आहे. हा व्यवसाय देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये नंबर 1 वर आहे.