शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला वाढता पाठिंबा! सर्व विराेधी पक्षांसह देशभरातील ४०० संघटना सहभागी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला आता सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्ष काँग्रेससोबतच तृणमूल, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा), समाजवादी पक्ष तसेच डावे पक्ष आदी विरोधी पक्ष सामील होणार आहेत.

शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील ४०० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. बंदमध्ये माकप, भाकप, सीपीआय (एमएल), रेव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षही सहभागी होणार आहेत.

मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारने आधी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यानंतर शेतकऱ्यांचा वाढत रोष पाहता केंद्रानं शेतकऱ्यांना चर्चेचे आमंत्रण दिले. मात्र, शेतकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीतून कुठलाही तोडगा निघाला नाही. नवे कृषी कायदे मागे घेण्याची आपली प्रमुख मागणी शेतकरी लावून धरत आहेत. तर केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यास अपयशी ठरली असून कृषी कायदे मागे न घेण्यावर अडून आहे. अशातच ”आर या पार” ची भूमिका घेत शेतकऱ्यांनी मंगळवारी, ८ डिसेंबरला ”भारत बंद”ची हाक दिली आहे.

शेतकऱ्याच्या बंदला पाठिंबा देणारी राज्ये व सत्ताधारी पक्ष
महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, पंजाब : काँग्रेस, पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस, राजस्थान : काँग्रेस, नवी दिल्ली : आम आदमी पक्ष, छत्तीसगड : काँग्रेस, झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ : डावी आघाडी

विजेंदरचा खेलरत्न परत करण्याचा इशारा; कलाकारांकडून समर्थन
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास खेलरत्न पुरस्कार परत करू, असे विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे. आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे. अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांनी आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शकांना १ कोटी रुपयांची देणगीही दिली.

शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने न सोडवल्यास देशभरातील लोक या आंदोलनात उतरतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार लवकरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment