‘आम्हाला नक्षलवादी होण्याची परवानगी द्या’; उद्विग्न शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली – अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान केले. त्यामुळे रब्बी हंगाम तरी साथ देईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र महावितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू अर्धे बिल भरूनही वीज तोडणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोड्याच्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे नक्षलवादी होण्याची परवानगी मागितली आहे.

या वर्षी सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके तरी साथ देतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. परंतु ऐन पाण्यावर आलेल्या हरबरा, गहू, ज्वारी आदी पिकांचे नुकसान होत आहे. अशातच महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या विज तोडणीला सुरुवात केल्यावर पिकांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. उधार उसनवार करून पिकांची पेरणी केली. महागडी औषधे फवारणी केली. परंतु पाण्याअभावी सर्व पिके उघड्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. महावितरण कंपनीकडून कुठलीही नोटीस न बजावता तालुक्यातील जवळपास ८५ टक्के कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अर्धे वीजबिल भरून शेतकऱ्यांना वीज जोडणी करून दिली जात नाही. कुठलाही अधिकारी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता वीज कनेक्शन तोडले जात आहे. जवळ पैसे नसल्याने संपूर्ण वीजबिल भरण्यासाठी पैसे आणायचे कुठून असा पडत आहे. त्यामुळे आमच्या संपूर्ण गावातील पुरुष, महिला व मुलांसहित नक्षलवादी होण्याची परवानगी देण्यात यावी.

या मागणीसाठी प्रशासनामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून ताकतोडा गावात बॅनर लावून शेतकरी उपोषणाला बसले आहेत. या निवेदनावर नामदेव पतंगे, श्रीराम सावके, बबन सावके, संतोष सावके, अमोल सावके, नामदेव गवळी, गोपाल सावके, संतोष कोरडे, राहुल भवर, गणेश सावके, गजानन सावके, ज्ञानेश्वर सावके, शालीक सावके, पांडुरंग शिंदे, मनोहर सावके, विठ्ठल पतंगे, प्रवीण शिंदे, गजानन उजेळे, वैभव सावके, भीमराव सावके, किसन सावके, नारायण सावके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You might also like