कामाचे बिल काढण्यासाठी 2 टक्के लाच घेताना अभियंता जाळ्यात सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

कामाचे बिल मंजूर करून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी दोन टक्के लाच मागणाऱ्या जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी सतीश पंचप्पा लब्बा (वय- 48, मूळ रा. सिध्देश्वर पेठ, सोलापूर, सध्या रा.- सदरबझार) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. सतीश लब्बा यांच्या कार्यालयातच दुपारी पावणेतीन वाजता त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने जलसंधारण विभागात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई सांगलीचे पोलीस उपाधीक्षक सुजय घाडगे यांच्या सूचनेप्रमाणे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत यांनी केली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजे, काटकर, येवले, भोसले यांनी सहभाग घेतला होता.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी सातारा जिल्ह्यामध्ये मृदा संधारणाचे एक काम पूर्ण केले होते या कामाचे बिल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी सतीश लब्बा (जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी वर्ग १, मूळ राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर सध्या राहणार सदर बाजार ) सातारा यांच्या टेबलवर फाईल आली होती एकूण बिलाच्या दोन टक्के रक्कम लाचेची मागणी लब्बा यांनी तक्रारदार यांच्याकडे केली तडजोडी अंत ही रक्कम 92 हजार रुपये इतकी ठरली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर 28 जुलै रोजी याची पडताळणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक सचिन राऊत यांनी लब्बा यांच्या कार्यालयात सापळा रचला आणि दुपारी पावणेतीन च्या दरम्यान लब्बा याला 92 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा अहवाल मृदा व जलसंधारण विभाग मंत्रालयाचे मुख्य सचिव यांना पाठवण्यात आला आहे. या कारवाईने जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली लब्बा यांना ताब्यात घेण्यात आले, असून सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांची याप्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे.