व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

जागेच्या वादातून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याने वृद्धाचा मृत्यू

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज-पंढरपूर रस्त्यावर राहणार्‍या जयंतीलाल मुलजी ठक्कर यांना जागेच्या वादातून त्यांच्या शेजारी राहणार्‍या राहुल मोरे याने केलेल्या जबर मारहाणीत ठक्कर यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राहुल मोरे याला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरकोळ कारणातून वृद्धाचा मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, जयंतीलाल मोरजी ठक्कर यांचा मुलगा मयूर जयंतीलाल ठक्कर यांचा शेजारीच राहणार्‍या राहुल मोरे यांच्यासोबत घर जागेचा वाद सुरू होता. गुरुवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास राहुल मोरे व मयूर ठक्कर यांच्यात वादास सुरुवात झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर बाहेर कोणाचे भांडण चालले आहे म्हणून जयंतीलाल ठक्कर आले व त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी संतप्त राहुल मोरे याने जयंतीलााल ठक्कर यांना तू मध्ये पडू नकोस म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जोरात ढकलून दिले. जोरात ढकलल्याने जयंतीलाल दगडावर पडले आणि बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याबद्दल राहुल मोरे यांच्या विरोधात ठक्कर कुटुंबियांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी राहुल मोरे यास ताब्यात घेतले आहे.