संप मागे घेतला तरच पगारवाढ; अनिल परब यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करून सरकारने दिलासा देऊनही कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहणार असेल तर त्याला काही अर्थ नाही. सरकार चार पावले पुढे आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत कामावर यावे, असे आवाहन करतानाच संप मागे न घेतल्यास पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला

जेव्हा कामकाज सुरू होईल. तेव्हा छोट्यामोठ्या गोष्टींवर चर्चा होईल. पण, आर्थिक भार सोसायचा आणि एसटी बंद ठेवायची असं होणार नाही. सरकारला विचारच करावा लागेल. पैसे देऊन संप चालू राहणार तर पैसे न देता संप चालू राहिला तर काय वाईट आहे. असा विचार सरकार करु शकतो. त्यामुळे आम्ही चार पावलं पुढे आलोय. दोन पावलं तुम्ही मागे व्हा, असे आवाहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

आर्थिक भार स्वीकारत राहायचे आणि त्याबदल्यात एसटी बंद ठेवायची, असे चालणार नाही. पगारवाढ देताना सरकारने वेतनाची हमी घेतली आहे. बहुतेक मागण्या मान्य केल्या आहेत. सातवा वेतन आयोग लागू करा आणि चार वर्षांचा करार दहा वर्षांचा करा, अशा काही मागण्या चर्चेतून समोर आल्या आहेत. त्यावरही विचार करू शकतो.

पगारवाढ दिल्यानंतर संपाबाबत जो संभ्रम आहे, समज गैरसमजाबाबतही चर्चा झाली. जी आश्वासनं मी देतोय, काही जाचक अटी असतील त्यावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार नाही. पण बेशिस्तही खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांना सांगितलं.

दरम्यान, सरकारच्या वेतनवाढीच्या निर्णयानंतर तब्बल 20 हजार कर्मचारी कामावर परतल्याची माहिती आहे. तर आतापर्यंत 3215 कर्मचाऱ्यांना कामावरुन निलंबित करण्यात आलं आहे. तर 1226 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्त करण्यात आली आहे.

You might also like