जनावरे चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; 5 लाख 2हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जालना : शहरातील विविध भागांतून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुनेद अब्बास कुरेशी, रफीक शेख नुर शेख, निहाल कैसर कुरेशी, शहाजद ऊर्फ सज्जू इजाज कुरेशी हे चौघेही सिल्लेखाना, औरंगाबाद व जावेद खान नवाज खान हा बायजीपुरा, औरंगाबाद येथील रहिवाशी आहे. हे सर्व संशयित आरोपी आहेत.

बुधवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना पॉवरलूम परिसरातून एक संशयित महिंद्र पिकअप वाहन वेगात जाताना दिसले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून जुन्या एमआयडीसी परिसरात थांबविले. या वाहनात तीन इसम होते. पिकअपची पाहणी केली असता, मागील बाजूस एक गाय दिसून आली. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी जुन्या एमआयडीसी परिसरातून गाय चोरल्याचे सांगितले. तसेच जालना शहरातील विविध भागातून जनावरे चोरी करून औरंगाबाद येथील निहाल कैसर कुरेशी, शहाजद ऊर्फ सज्जू इजाज कुरेशी यांना विकल्याचे सांगितले.

दोन्ही आरोपींना औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम १ लाख ०२ हजार रुपये, दोरखंड, एक गाय, पिकअप असा एकूण ५ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि. दुर्गेश राजपूत, पोहेकॉ. हरीश राठोड, सॅम्यअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, संदीप मान्टे, देविदास भोजणे, विलास चेके, रवी जाधव आदींनी केली.

You might also like