सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
गेली अनेक महिने पाण्यावाचून तडफडत असलेल्या तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावकऱ्यांना टँकरची मागणी करून देखील टँकर देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याने आज सरपंचांनी थेट हातात रॉकेलचा कॅन घेऊन आत्मदहन करण्यासाठी तहसील कार्यालय गाठले. सरपंचांचा रुद्रावतार पाहून प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर चर्चेनंतर प्रशासनाने अवघ्या दोन तासात टँकरच्या चार खेपा मंजूर केल्या.
गेल्या दहा दिवसांपासून तासगाव तालुक्यातील सिद्धेवाडी गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागत असताना प्रशासनाने प्रस्ताव मंजूर केला नाही. या प्रस्तावावर तलाठ्याने सही करण्यासाठी १० दिवस लावले. प्रशासनाला पाणी प्रश्नाचे गांभीर्य नाही, असा आरोप करीत संतप्त झालेले सिद्धेवाडी येथील सरपंच पंचाक्षर जंगम यांनी आज आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी जंगम चक्क रॉकेलचा कॅन हातात घेऊन तहसील कार्यालयात दाखल झाले.
जंगम हे तहसीलदार यांच्या दालनासमोर जाऊन अंगावर रॉकेल ओतून घेणार एवढ्यात तिथे असणाऱ्या पोलिसांनी त्यांच्या हातातून रॉकेलचा कॅन घेऊन तो जप्त केला. दरम्यान, जंगम यांच्या नुसत्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने अवघ्या २ तासात टँकरच्या ४ खेपा सिद्धेवाडीसाठी प्रशासनाने मंजूर केल्या. एकीकडे टँकरच्या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवून देखील टँकर मंजूर होत नाहीत मात्र दुसरीकडे सरपंचांनी केलेल्या एका स्टंटबाजी ने टँकरच्या खेपा मंजूर झाल्या. प्रशासनाच्या या अजब कारभाराची चर्चा संपूर्ण तालुक्यात होती. माणसं पाणी पाणी करून मेल्यावर प्रशासन पाणी देणार का? असा संतप्त सवाल आता तालुक्यातील लोक उपस्थित करत आहेत.