कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले. यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश प्रवक्‍ते सचिन सावंत, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, देवानंद पवार हे उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, “राज्यात ओबीसी व मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे; परंतु तो काही कारणास्तव विखुरला गेला आहे. त्यांना एकत्र करून कॉंग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे ही जबाबदारी राजकीय अनुभव, संघटन कौशल्य असणारे आणि ओबीसींच्या भावना लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या संमतीने भानुदास माळी यांच्या खांद्यावर ओबीसी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी टाकत आहे. भानुदास माळी यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील ओबीसीसह इतर समाज कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवाहात येईल. तसेच काँग्रेस पक्ष हा तळागाळापर्यंत पोहोचून मजबूत होईल.” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

“देशातील सर्वात मोठ्या आणि स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या कॉंग्रेस पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडून राज्यातील ओबीसीसह इतर समाजातील लोकांना कॉंग्रेसमध्ये आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन.” असे मत कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भानुदास माळी यांनी व्यक्त केले.

Leave a Comment