मसूर, पुसेसावळी व वडूज येथील सशस्त्र दरोडे उघडकीस : संशयित टोळीला बेड्या

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज येथे गेल्या तीन महिन्यांपासून दरोडे टाकून हादरवून सोडणार्‍या 5 जणांच्या अट्टल टोळीला सातारा गुन्हे शाखा पथकाने (एलसीबी) अहमदनगर पोलिसांच्या सहकार्याने पकडले. यामध्ये दोन घरफोड्यांचीही संशयितांनी कबुली दिली असून ही कारवाई माहिजळगाव (ता. कर्जत व वाकी ता. आष्टी, जि. नगर) येथे करण्यात आली आहे. अविनाश ऊर्फ काल्या सुभाष भोसले, अजय सुभाष भोसले, सचिन सुभाष भोसले (रा. माहिजळगाव), राहुल ऊर्फ काल्या भोसले (रा. वाळुंज, नगर), होमराज ऊर्फ होम्या उद्धव काळे (रा. वाकी, आष्टी, बीड) अशा बेड्या ठोकलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, 5 जानेवारी रोजी पुसेसावळी, 2 मार्चला मसूर व 11 मार्च रोजी वडूज या तीन ठिकाणी दरोडा टाकून एकूण 11 लाख 15 हजारांचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल लुटून नेला होता. या तिन्ही गुन्ह्यात संशयित आरोपींनी दरोडा टाकताना घरातील सदस्यांना जबर मारहाण करुन जखमी केले होते.

सातारा एलसीबी पोलिस या गुन्ह्यातील मोडस नगर जिल्ह्यात घडणार्‍या गुन्ह्यासारखीच असल्याने सातारा पोलिसांनी तसे लक्ष केंद्रित केले. तपास करत असताना संशियीत आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली. सातारा पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारावर संशयितांची माहिती मिळत गेली. खात्री झाल्यानंतर सातारचे पोलिस अहमदनगरमध्ये पोहचले. कर्जत पोलिसांची मदत घेवून संयुक्त पथकाने 13 मार्च रोजी पहाटे माहीजळगाव (कर्जत) व वाकी (आष्टी) येथे कोंबिंग ऑपरेशन राबवले.

संशयितांची धरपकड केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी 3 दरोड्याच्या गुन्ह्यासह इतर 2 अशा 5 गुन्ह्यांची कबुली दिली. यामुळे पोलिसांनी संबंधितांचा ताबा घेवून त्यांना बेड्या ठोकल्या. प्राथमिक माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेली वाहने ताब्यात घेतली आहेत. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनिकिशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि रमेश गर्जे, सपोनिमालोजी देशमुख, फौजदार गणेश वाघ, पोलिस तानाजी माने, उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, संतोष सपकाळ, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, निलेश काटकर, मुनीर मुल्ला यांच्यासह नगरच्या पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.