तुमच्याकडे धनुष्यबाण तरी हातात आहे का? शेलारांचा उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपवर सडकून टीका केली. तसेच हिंमत असेल तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घ्या असं आव्हान दिले. यानंतर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना काही प्रश्न केले आहेत. स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा का लगेचच निवडणुका घेतल्या नाहीत? आणि आता लगेच निवडणूक घ्या पण तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का? असा बोचरा सवाल शेलारांनी केला.

भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस सोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादी सोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला, आता मुंबईकरांचे हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली अशी अवस्था पेग्विन सेनेची झाली आहे.

फडणवीसांसमोरील आव्हानांची सामनाच्या अग्रलेखातून पेग्विन सेनेने चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रासमोरील आव्हाने काय आहेत याची पुर्ण कल्पना असलेले देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत ते आव्हांनाना निढळ्या छातीने सामोरे जातात…. घरात बसून राहत नाहीत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी आहे… सामनाच्या अग्रलेखात आता पेग्विन सेनेसमोरील आव्हानांची जाहीर चर्चा करा… आज त्याची गरज आहे. असा टोला आशिष शेलारांनी लगावला .

बुलेट ट्रेनला विरोध करणारे, 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करणारे, 1 लाख कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या जैतापूर प्रकल्पालाही विरोध करणारे, मेट्रो पासून कोस्टल रोड पर्यंत आणि मुंबईत पर्यावरणपूरक एलईडी दिवे लावताना सुध्दा विरोध, विरोध आणि विरोधाचा झेंडा फडकवणारी पेग्विन सेना आज फॉक्सकॉन आणि वेदांताच्या नावाने गळे काढत आहेत असा आरोप आशिष शेलार यांनी केला.

म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का? स्वतः मुख्यमंत्री होतात तेव्हा का निवडणूक लगेचच घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या. आम्ही तयार आहोत….तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का? असा बोचरा सवाल आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला.