गहलोत अध्यक्ष तर पायलट मुख्यमंत्री?? काँग्रेसमध्ये हालचालींना वेग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राहुल गांधी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यांनतर आता राजस्थानचे मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासू असलेले अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. पण ‘एक व्यक्ती एक पद’ असे स्पष्ट मत राहुल गांधींनी मांडल्यामुळे गहलोत याना राजस्थानचे मुख्यमंत्री पद सोडावं लागण्याची शक्यता आहे. तस झाल्यास सचिन पायलट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.

आज भारत जोडो यात्रेचा विश्रांतीचा दिवस असतानाच राहुल गांधी दिल्लीला रवाना झाले आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी , प्रियांका गांधी आणि अशोक गहलोत यांच्यात आज बैठक होण्याची शक्यता असून यामध्ये राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सचिन पायलट यांचेच नाव यामध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत यांच्या उमेदवारीची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे सचिन पायलट यांनी सर्व काँग्रेस आमदारांशी बोलणे सुरू केले आहे. सचिन पायलट यांनी अनेक आमदारांशी राजकीय विषयांवर चर्चा केली आहे. पायलट यांनी कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या अशा अनेक आमदारांशीही संवाद साधला आहे.राजकारणातील बदललेल्या राजकीय समीकरणांचेच हे लक्षण मानले जात आहे.  काँग्रेस हायकमांड कडूनच पायलट याना नव्या जबाबदारीचे संकेत देण्यात आले आहेत असं म्हंटल जात आहे.

दरम्यान, अशोक गहलोत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजस्थानचे पंचायती राज आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री राजेंद्र गुडा यांनी देखील पायलट यांच्या नावाला आमचा विरोध नसल्याचे जाहीर केलं आहे. जर अशोक गेहलोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि मुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड झाली तर तर ते आणि त्यांच्या सोबतचे आमदार विरोध करणार नाहीत. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी जो निर्णय घेतील, ते सर्वांना मान्य असेल. असेही त्यांनी स्पष्ट केलं.