निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी पदाचा दिला राजीनामा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते आशियाई विकास बँकेत उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. आशियाई विकास बँकेत ते दिवाकर गुप्ता यांची जागा घेतील. बिहार निवडणुकांपूर्वी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु लवासा यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रपतींकडे कार्यमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचं राष्ट्रपतींचे माध्यम सचिव अजय कुमार सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.

जानेवारी २०१८ मध्ये लवासा यांनी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या इतिहासात आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे लवासा हे दुसरे आयुक्त ठरले आहेत. अशोक लवासा यांच्यापूर्वी १९७३ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त नागेंद्र सिंग यांनी आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. दरम्यान, अशोक लवासा यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना एप्रिल २०२१ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती मिळाली असती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment