सख्खा भाऊ, पक्का वैरी ! ठाण्यात सख्ख्या भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – आपल्या मराठी भाषेमध्ये सख्खा भाऊ, पक्का वैरी अशी एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय ठाण्यातील कळवा याठिकाणी आला आहे. सुरुवातीला आरोपी भावाकडून मृतक तरुण हा बेपत्ता असल्याचा बनाव तयार करण्यात आला. मात्र जेव्हा पोलिसांनी तपास करून सत्य शोधलं असता कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मृत व्यक्तीच्या सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या करण्यासाठी 50 हजार रुपयांची सुपारी दिली होती. हि घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण कळवा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्तीचे नाव मंगेश पाटील असे आहे. तो 26 वर्षांचा होता. तर त्याच्या आरोपी सख्ख्या भावाचे नाव उद्देश पाटील असे आहे. आरोपी भाऊ उद्देशने कळव्यात असलेल्या प्रवीण जगताप नावाच्या एका तरुणाला आपल्या सख्ख्या भावाला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. उद्देशने कोणत्या कारणामुळे आपल्या सख्ख्या भावाची सुपारी दिली हे अजून समजू शकलेले नाही. पण उद्देशने आपल्या भावाला मारण्याती सुपारी दिल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरातील आणि कुटुंबियातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. उद्देशने आपला भाऊ मंगेशची सुपारी दिल्यानंतर प्रवीण कुकृत्याच्या कामाला लागला.

प्रवीणने मंगेशला गोड बोलून मुरबाडला नेलं. त्यानंतर तिथे त्याची गळा चिरून हत्या केली. आरोपी प्रवीण एवढ्यावरच थांबलं नाही. त्याने कुणाला हत्येचा सुगावा लागू नये म्हणून मंगेशचा मृतदेह जमीनीखाली गाडला. तरीदेखील गुन्हेगार कितीही चलाख असला तरी काहीतरी पुरावा मागे सोडतोच. अगदी तसंच काहीसं या प्रकरणात झाले. कळव्यात मंगेशच्या कुटुंबियांनी तो मिसिंग असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी मंगेशचा शोध घेत असताना त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले. यावेळी मंगेश ज्यादिवसापासून बेपत्ता आहे त्यादिवशी त्याने एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन बातचित केली होती. यानंतर पोलिसांनी त्या मोबाईल नंबरची डिटेल्स काढली असता तो नंबर आरोपी प्रवीण याच्याच नावावर होता. यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवीणची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. तसेच मंगेशच्या भावानेच आपल्याला त्याच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.