Wednesday, October 5, 2022

Buy now

सातारा शहराजवळील पुरातन काळातील गाडे वाड्याला मध्यरात्री आग, कारण अस्पष्ट

सातारा | कोंडवे येथील पुरातन काळातील असलेल्या गाडे वाड्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीमध्ये वाड्यामधील तीन घरातील घरगुती साहित्य जळून गाडे कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, अगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मध्यरात्री जुन्या काळातील लाकडाच्या असलेल्या गाडे वाड्याला अचानक आग लागली. आग लागल्याची चाहूल वाड्यामध्ये कुटुंबातील एक झोपलेल्या व्यक्तीस लागल्याने सर्वत्र खळबळ उडाली. लाकडाच्या वाड्याने पेट घेतल्याने आगीचा डोंबाळा उडाला होता. संबंधित गावकऱ्यांनी दूरध्वनीवरून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेबाबत कळविले. घटनास्थळी अग्निशामन दल दाखल होऊन अग्निशामन बंबाच्या सहाय्याने सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नातून आग विझवण्यात यश आले.

आग विजवण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी धडपड केली होती. आगीत घरातील कपडे, धान्य, कपाट आदी साहित्य जळून रहिवाशाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या वाड्यात एका व्यक्ती शिवाय कोणीही राहण्यास नसल्याने मोठी जीवितहानी टळली. वाड्याला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारी घरांना आगीची झळ लागून घरांचे तडे जाऊन काही प्रमाणात शेजारील घरांचे नुकसान झाले आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.