गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, लाईव्ह व्हिडिओ आला समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरामध्ये पीएसी बटालियनच्या जवानांवर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. रविवारी सायंकाळी हि खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच मंदिरात इतरत्र तैनात जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. इतर जवानांना येताना पाहून हल्लेखोराने जोरजोरात अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. अहमद मुर्तजा असे या आरोपी हल्लेखोराचे नाव आहे. मोठ्या प्रयत्नानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.

हल्लेखोराचा दहशतवादी संघटनेशी संबंध ?
अहमद मुर्तजा हा गोरखपूरचा रहिवासी असून तो कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समोर आलेली नाही. पीएसी बटालियनचे जवान गोपाल गौर आणि अनिल कुमार पासवान गोरखनाथ मंदिराच्या दक्षिणेकडील गेटवर कर्तव्यावर होते. घटनेच्या दिवशी म्हणजे रविवारी सायंकाळी आरोपी मंदिरांच्या उत्तर-पूर्व दरवाज्यातून वेगाने आत आला. यानंतर त्याने मुख्य दरवाजावर तैनात असलेल्या हवालदार गोपाल यांच्या जवळ येत त्यांच्याकडील शस्त्र हिसकावून घेण्यास सुरवात केली. जवान गोपाल गौर यांना काही कळायच्या आत हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यास सुरुवात केली. यादरम्यान गोपाल यांचा आवाज ऐकून दुसरा हवालदार पळत आला असता त्यालादेखील हल्लेखोराने जखमी केले.

आरोपी उच्चशिक्षित असून इंजिनिअरिंग शिकलाय
हाती आलेल्या माहितीनुसार, आरोपी मुर्तजाने आयआयटी मुंबईतून इंजिनीअरिंग केले आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. तसेच त्याची नोकरीसुद्धा सुटली आहे. या सगळ्यांमुळे तो प्रचंड मानसिक तणावात होता. यातूनच त्याने हे कृत्य केले. सुरक्षारक्षकांनी जेव्हा त्याला पकडले तेव्हा तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट सांगत होता की त्याला कोणीतरी गोळी मारा. या चकमकीत तो जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु
या घटनेमागे नेमके काय सत्य आहे ? याचा तपास पोलीस करत आहेत. या आरोपी हल्लेखोराकडून धारदार शस्त्र, पेन ड्राईव्ह, लॅपटॉप आणि विमानाचे तिकिट जप्त करण्यात आले आहेत. यानंतर पोलिस परिसरात सर्च मोहिम राबवत आहेत तसेच आरोपीच्या वडिलांचीही चौकशी सुरु आहे.

Leave a Comment