एसटीच्या टपावर चढून वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर – महामंडळाचे राज्यशासनाने विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 40 दिवसांपासून एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, रविवारी लातूर जिल्ह्यातील औसा आगारातील एका वाहकाने एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि उपस्थित आंदोलन कामगारांनी वेळेस मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, औसा आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले रविराज बिराजदार (39, रा. औसा) हेही आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान काल सकाळच्या सुमारास रविराज बिराजदार हे हातात पेट्रोलचे बॉटल घेऊन अचानक आगाराजवळ आले. काही कळायच्या आतच त्यांनी धावत आगारात थांबलेल्या एसटी बसच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या पाठीमागे बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचारी आणि आंदोलनस्थळी असलेले कामगारही धावले. यावेळी काही कामगारांनी टपावर चढत रविराज बिराजदार यांच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, पोलिसांनी कामगारांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला असून त्याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

You might also like