Wednesday, February 8, 2023

मायणीत बालाजी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, बाजारपेठेत भीतीचे वातावरण

- Advertisement -

मायणी | येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बालाजी ज्वेलर्स वर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ज्वेलरीचे मालक अमित माने यांनी धाडसाने दरोडेखोरांशी दोन हात केल्याने चारही दरडेखोरांना पळवून लावण्यात यश आले. या घटनेने मायणी बाजारपेठेसह व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळावरून घटनेची मिळालेली माहिती अशी : मायणी येथील यशवंत बाबा मंदिर परिसरात मेन रोडला अमित प्रभाकर माने (रा. भवानी माळ, पाटील वस्ती विटा, सध्या रा. मायणी) यांचे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. रात्री आठच्या दरम्यान, बहुतांशी दुकाने बंद करून दुकानदार घरी गेले होते. यावेळी नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री आठ वाजता माने दिवसभरातील हिशोब लिहीत होते. त्यावेळी अचानक पांढरा, निळा, काळा व केसरी अशा वेगवेगळ्या रंगाचे जरकिन, ट्रॅक सूट घातलेले व तोंडाला गोल मास्क लावलेले चौघेजण दुकानात आले. त्यापैकी एकाने ‘माल काढ’ असे म्हणत, दुसऱ्याने माने यांचेवर बंदूक रोखली. मात्र बंदुकीच्या धाकाला भीक न घालता माने यांनी सर्व शक्तीनिशी त्यांना प्रतिकार केला. दरोडेखोर व माने यांच्यात झटापट झाली. त्यावेळी माने यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील व पेठेतील काही दुकानदार तेथे धावून आले. मात्र त्यांचेवरही तिसऱ्या दरोडेखोरांने बंदूक रोखल्याने ते घाबरून जिवाच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी थांबले. मात्र, घटनास्थळाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचे दिसताच दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. दुकानाबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीवरून त्यांनी धूम ठोकली. बाहेर अंधार असल्याने त्या गाड्यांचे नंबर दिसू शकले नाहीत. तसेच तोंडावर मास्क असल्याने, दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चेहरे दिसत नाहीत.

- Advertisement -

मारहाणीस सुरुवात करत दुकानातील सोने चांदी आणि पैसे असा सर्व ऐवज देण्यासाठी धमकावले. दरम्यान, घटनेची नोंद पोलिसात झाली असून तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. पथके तयार करून तपासासाठी ठिकठिकाणी रवाना केलीत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.