औरंगाबाद – शहराचा आता अंडरग्राऊंड नकाशा तयार होणार आहे. प्रभाग नऊमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जीपीआर सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आहे. स्मार्ट सिटी अभियानातून मास्टर सिटी इंटीग्रेटेड प्रकल्प राबविला जात आहे. त्यात जीपीआर सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे जमिनीखालील विद्युत वाहिन्या, पाइपलाइन यासह इतर माहिती मिळणार आहे.
मास्टर सिस्टम इंटीग्रेटेड प्रकल्पाचा प्रशासकांनी नुकताच आढावा घेतला. त्यात जीपीआर सर्व्हेक्षणावर चर्चा करण्यात आली. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी ऑपरेशन कमांड सेंटर होणार आहे. त्यासाठी विद्युत वहिनी टाकणे आवश्यक आहे. विद्युत वाहिनी टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करावे लागणार आहे. मात्र रस्ता खोदण्यास प्रशासकांनी नाकार दिला आहे. याऐवजी अंडरग्राउंड डिलिंग या प्रणालीचा वापर करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. रस्त्याला कुठलीही हानी न पोहोचता आडवा खड्डा तयार करता येतो. यासाठी अंडरग्राऊंड ड्रीलिंग मशीन उपलब्ध आहेत. मात्र या पद्धतीत कुठल्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी जमिनीखाली असलेल्या पाइपलाइन, विजेची लाईन याची तपासणी करावी लागते.
नव्या तंत्रज्ञानानुसार बुधवारी रात्री व्हीआयपी रोडवर ग्राउंड पेनेट्रेशन सर्व्हे करण्यात आला. त्यानुसार जमिनीखाली असणारी विद्युत वहिनी, पाइपलाइन आणि ड्रेनेजलाइन आढळल्या. त्यामुळे तेथे आडवी ड्रीलिंग करून विद्युत वाहिनी टाकण्यात येईल, असे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात प्रभाग नऊमध्ये जीपीआर सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला. आढावा बैठकीला स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, प्रकल्प अभियंता फैज अली, सहायक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, केईसी इंटरनॅशनलच्या बी. एस. सुधनवन, जगदंबा रॉय, अमित गुप्ता व सल्लागार समितीचे प्रसाद पाटील उपस्थित होते.