औरंगाबाद । औरंगाबादमध्ये नियमबाह्य पद्धतीने वक्फ बोर्डाच्या जमिनीची विक्री करत 100 कोटींचा घोटाळा केला गेला असल्याचा दावा खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या घोटाळ्यात मनपा ,रजिस्ट्री कार्यालय आणि वक्फ बोर्डातील अधिकारी सामील असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केला. याशिवाय घोटाळ्यातील दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही जलील यांनी सरकारला दिला आहे.
जलील यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळ्याविषयी बरेच दावे केले. औरंगाबादमधील जालना रोडवरील सर्वात पॉश भागात वक्फ बोर्डाची जमीन प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या वक्फ बोर्डाच्या जमिनी विकल्या गेल्या आहेत. या जागेवर नियमबाह्य पद्धतीने बांधकाम करून 100 कोटींचा घोटाळा करण्यात आला असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. या घोटाळ्याविषयीचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे जलील यांनी यावेळी सांगितलं. या घोटाळ्यात मनपा अधिकारी, रजिस्ट्री कार्यालय आणि वक्फ बोर्डातील अधिकारी सामील असल्याचा गंभीर आरोप जलील यांनी यावेळी केला.
तसेच याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार देत या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आपण केली असल्याचे खा.जलील यांनी यावेळी सांगितलं आहे. आपल्या मागणीवर अनिल देशमुखांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास एक हजार नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण २६ फेब्रुवारीला आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जलील यांनी जाहीर केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.