व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ महिन्यात होणार औरंगाबाद मनपा निवडणूक? 

औरंगाबाद – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयोगाकडून शहराचा नकाशा मंगळवारी महापालिकेला प्राप्त होणार आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होईल, या अंदाजानुसार कामे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

कोरोना संसर्ग व सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमुळे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. याचिका निकाली निघण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करून पाठविण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. महापालिकेने कच्चा आराखडा पाठविला देखील. पण ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला व पुन्हा निवडणूक लांबणीवर पडली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाविना निवडणूका घेण्याचे आदेश देताच निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. पण औरंगाबाद महापालिकेची निवडणूक दुसऱ्या टप्पात होण्याची शक्यता आहे.

 

महापालिकेने यापूर्वी शहराचा नकाशा निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. पण निवडणूक आयोगाने तो मान्य केला नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या नकाशानुसार वॉर्डांची हद्द निश्चिती करून प्रभाग रचनेचा आराखडा पाठविला जाणार आहे. तो मंजूर झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात होईल. आरक्षणाची सोडत निघेल. त्यावर हरकती सूचना मागविल्या जातील. या प्रक्रियेला किमान तीन महिन्यांचा वेळ लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

 

महापालिका निवडणुकीसाठी 12 लाख 28 हजार 32 अशी ही लोकसंख्या ग्राह्य धरली जाणार आहे. असे असले तरी नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. त्यानुसार 42 प्रभाग तयार होतील. वॉर्ड तयार करताना झिकझॅक पद्धत वापरली जाणार आहे.