औरंगाबाद महापालिका आता दररोज करणार दहा हजार चाचण्या

मनपाकडून अडीच लाख किटसची खरेदी

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाची वाढत चाललेली साखळी खंडित करण्यासाठी आता महापालिकेने रूग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर भर दिला आहे. यासाठी रोज दहा हजार चाचण्या करण्याचे टार्गेट प्रशासनाने निश्चित केले आहे. आगामी काळात चाचण्याची ही जम्बो मोहीम राबवण्यासाठी अडीच लाख अँटिजेन किटसची पालिकेने खरेदी केली आहे.

औरंगाबाद शहरात महिनाभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. यामुळे शहरात कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संसर्ग अधिक गतीने परसत असल्याने त्यास नियंत्रित करण्यासाठी आता कोरोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी आदेशित केले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी दिली.

लसीकरणाची मेगा मोहीम प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाणार आहे. त्यासोबतच चाचण्यांचीही मोहीम राबवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या रोज सरासरी चार ते पाच हजार कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.  तीच संख्या दहा हजारापर्यंत नेण्याचे उद्दीष्ट प्रशासकांनी दिले आहे. त्यादृष्टीने नियोजन देखील केले जात आहे, असे डॉ. राठोडकर यांनी सांगितले.

सध्या साडेतीन लाख किटस् उपलब्ध…

चाचण्यांची जम्बो मोहीम राबवण्यासाठी पालिकेने अडीच लाख अँटिजेन किटस् खरेदी केल्या आहेत. पूर्वीच्या एक लाख किटस् अजून शिल्लक आहेत. त्यामुळे अँटिजेन किटसची संख्या साडेतीन लाख झाली आहे. यापैकी काही किटस् जिल्हा परिषदेला आणि काही किटस् जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिल्या जाणार आहेत.

आरटीपीसीआरच्या एक लाख किट्स…

आरटीपीसीआर चाचणीच्या एक लाख किटस् पालिकेकडे आहेत. दोन्हीही प्रकारच्या किटची संख्या पुरेशी असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण लगेचच वाढवणे शक्य आहे. त्यातून कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल, अशी आशा आहे.

You might also like