कोरोना हाहाकार ! औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोरोना बाधित असलेल्या 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाचा हा १० वा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या या रुग्णाचा रविवारी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. तीन दिवसांपासून रुग्णास खोकला, चक्कर येने असा त्रास होत होता. अतिशय गंभीर स्थितीत त्यांना घाटीमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे ऑक्स‍िजनचे प्रमाण केवळ 54 टक्के होते. अतिदक्षता ‍विभागात त्यांच्यावर कृत्रिम श्वास व कोविड संबंधी उपचार सुरू होते. त्यांना दोन्ही फुफ्फुसांचा न्यूमोनिआ, मधुमेहाचा आजार होता, असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी सकाळी नऊ कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढल्याने आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 291 झाली आहे. संबंधित नवे कोरोनाबाधित रुग्ण पंचशील दरवाजा, किलेअर्क (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), देवळाई (1),  पुंडलिक नगर (2), नंदनवन कॉलनी (1), जय भीमनगर (3) या परिसरातील आहेत. असेही डॉ. येळीकर यांनी सांगितले.

You might also like